4000 रुपयांची लाच स्विकारताना महापालिकेतील कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – दुकानाचा कर कमी करुन देण्यासाठी व्यावसायिकाकडून 4 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या जळगाव महानगरपालिकेतील चौकीदाराला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार) जळगाव महापालिकेत करण्यात आली. या कारवाईमुळे पालिकेत खळबळ उडाली आहे. विलास भिका पाटील (वय-55 रा. गिरणा पंपींगजवळ, जळगाव, ता. जि.जळगाव) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या चौकीदाराचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव येथील 44 वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली.

तक्रारदार यांचा जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात गाळा आहे. या गाळ्याचा कर कमी करण्यासाठी विलास पाटील याने तक्रारदार यांच्याकडे 4 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारादाराच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता पाटील याने लाच स्विकारण्याचे कबूल केले. लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी महापालिकेत सापळा रचून विलास पाटील याला पंचासमक्ष लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, पोलीस नाईक मनोज जोशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश पाटील यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com