EPFO 6 कोटी ग्राहकांना देणार झटका ! भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दरात कपात करण्याची करणार घोषणा ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना ( EPFO) आपल्या 6 कोटी ग्राहकांना धक्का देणार आहे. संस्था 4 मार्च 2021 रोजी 2020-21 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफवरील व्याज दराची घोषणा करणार असल्याचे समजते. वास्तविक. याच दिवशी, श्रीनगर येथे केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) बैठक होणार आहे, ज्यात ईपीएफओची मिळकत व आर्थिक परिस्थिती तपासली जाईल. त्याचबरोबर बैठकीत 2020-21 या आर्थिक वर्षासाठी व्याजदराच्या घोषणेच्या प्रस्तावावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही संस्था ईपीएफवरील व्याज दर कमी करून देणार असल्याचे म्हंटले जात आहे.

मंडळाने अलीकडेच म्हटले की, ग्राहकांना 31 मार्च 2021 अखेर दोन हप्त्यांमध्ये 8.50 टक्के व्याज दिले जाणार आहे. सदस्यांना पहिल्या हप्त्यात 8.15 टक्के आणि दुसर्‍या हप्त्यात 0.35 टक्के व्याज दिले जाईल. ईपीएफओने म्हटले कि, 8.50 टक्के व्याजात 8.15 टक्के कर्ज उत्पन्न आणि 0.35 टक्के ईटीएफच्या विक्रीतून मिळेल. ईपीएफओ बोर्डाचे सदस्य वृजेश उपाध्याय म्हणाले की, 2019-20 या आर्थिक वर्षाच्या व्याजदरामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही, परंतु सद्य परिस्थितीत ते दोन हप्त्यांमध्ये परत केले जाईल. ते म्हणाले की याक्षणी काही गुंतवणुकीतून पैसे काढता येणार नाहीत, कारण बाजारपेठेची परिस्थिती बिकट आहे.

ईपीएफओचे विश्वस्त केई रघुनाथन यांनी नुकताच सांगितले की, त्यांना 4 मार्च रोजी श्रीनगर येथे होणाऱ्या सीबीटीच्या बैठकीची माहिती मिळाली. बैठकीचा अजेंडा लवकरच येईल, मात्र बैठकीच्या माहितीशी संबंधित ई-मेलमध्ये व्याज दरावरील चर्चेचा कोणताही उल्लेख नाही. दरम्यान, ईपीएफओ 2020-21 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर कमी करू शकेल. असा विश्वास आहे की, कोरोना संकटाच्या वेळी पीएफमधून जास्त पैसे काढल्यामुळे आणि कमी योगदान झाल्यामुळे व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

मार्च 2020 मध्ये ईपीएफओने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 8.5 टक्क्यांपर्यंत कमी केले. गेल्या सात वर्षातील हे सर्वात कमी व्याज आहे. 2012-13 मध्ये यापूर्वी व्याजदर 8.5 टक्के होते. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये पीएफ ठेवींवर सदस्यांना 8.65 टक्के व्याज मिळाले होते. ईपीएफओने 2016-17 मध्ये पीएफ ठेवींवर 8.65 टक्के, 2017-18 साठी 8.55 टक्के आणि 2015-16 मध्ये 8.8 टक्के व्याज दिले होते. त्याचबरोबर 2013-14 मध्ये पीएफ ठेवींवर 8.75 टक्के व्याज दिले गेले होते, जे 2012-13 या आर्थिक वर्षात .8.5 टक्क्यांपेक्षा जास्त होते.