MMRDA चा ऑनलाईन रोजगार मेळावा, 6 जुलैपासून भरती, असं करा Apply

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (MMRDA) विविध कामं करणाऱ्या कंत्राटदारांकडील सुमारे 17 हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 2 हजार 923 पदांची भरती केली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यातील भरतीसाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने 6 ते 8 जुलै या कालावधीत तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कर्यालयांसाठी 8 ते 12 जुलै या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजता कौशल्या विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन रोगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

एपएमआरडीए अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे सुमारे 17 हजार गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सींग), फिटर (बार बेडिंग व फिक्सिंग), वेल्डर, इलेक्ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यापैकी ऑनलाइन मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात 2923 पदे भरली जाणार आहेत. हि विविध प्रकारची रिक्तपदे विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही रिक्तपदे मुख्यत: मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील आहेत.

एमएमआरडीएचे कंत्राटदार त्यांच्याकडील रिक्तपदे टप्प्याटप्प्याने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या बेवपोर्टलवर अधिसूचना करीत आहेत. त्यांच्याकडील रिक्तपदे जसजशी अधिसूचित करण्यात येतील त्याप्रमाणे भविष्यात वेळोवेळी अशा प्रकारचे ऑनलाईन रोजगार मेळावे पुन्हा आयोजित करून ही पदभरती करण्यात येणार आहे.

रिक्तपदांची माहिती वेबपोर्टलवर नोंदणी करण्यासाठी काही समस्या येत असेल तर विभागाच्या जिल्हास्तरावरील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे. राज्यातील संबंधित जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांचे पत्ते व दुरध्वनी क्रमांक https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

कसा करायचा अर्ज
– राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्या विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केली असेल तर पोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये आपला नोंदणी क्रमांक (युजर आयडी व पासवर्ड) वापरून नोंदणीची सर्व माहिती अद्यावत करा.

– ज्यांनी वेबपोर्टलवर नोंदणी केली नाही त्यांनी पोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Register वर क्लिक करून आपली सर्व माहिती भरून नवीन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर उमेदवाराला नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड येईल. तो वापरून वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID व पासवर्ड टाकून लॉगीन वर क्लिक करा.

– त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीत Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करून पोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील जिल्हा निवडा. त्यामधील Action – view details या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करा.

– त्यानंतर आपला ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील सहभाग पूर्ण होईल. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधित उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी माहिती मिळेल. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाइन पद्धतीने मुलाखत घेण्यासाठी इच्छुक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होईल.