‘या’ चित्रपटात एकत्र झळकणार अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता इम्रान हाश्मी याच्या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. दिग्दर्शक रूमा जाफरी यांचा हा सिनेमा असून इम्रानसाठी आनंदाची बाब अशी आहे की, इम्रान हाश्मी हा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत पडद्यावर झळकणार आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकताच हा चित्रपट साईन केला आहे. काही क्षणांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा झाली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या सोबत स्क्रिन शेअर करायला मिळणार असल्याने इम्रानचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याने ट्विट करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये इम्रान हाश्मी म्हणतो की, “आनंद पंडित यांची निर्मिती असणाऱ्या आणि रूमा जाफरी दिग्दर्शित चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या सोबत स्क्रिन शेअर करण्यास मी खूप म्हणजे खूप उत्सुक आहे. हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2020 ला प्रदर्शित होणार आहे.”

दरम्यान अमिताभ बच्चन हे देखील या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. अमिताभ यांनीही आगामी चित्रपटाबद्दलची उत्सुकता आपल्या ट्विटरवर ट्विट करत बोलून दाखवली आहे. आपल्या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात की, “अनेक वर्षांची कमिटमेंट आत्ता कुठे पूर्ण होत आहे. अखेर आनंद पंडित यांच्या नव्या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मीदेखील झळकणार आहे. हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2020 ला प्रदर्शित होणार आहे.” अमिताभ यांनी म्हटले आहे.

या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात असल्याचे समजत आहे. पुढील महिन्यात या चित्रपटाचे शुटींग सुरू होणार आहे. यात इम्रान आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय अन्नू कपूर आणि सौरभ शुक्ला यांसारखे दिग्गज कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा इम्रान हाश्मीचा व्हाय चीट इंडिया हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात इम्रानचा अभिनय सर्वांनाच भावला होता.