खाद्य पदार्थातून अमली पदार्थ परदेशी पाठविणाऱ्या तिघांना शिक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन – खाद्य पदार्थात अमली पदार्थ भरुन ते लंडनमध्ये निर्यात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना नार्कोटिस ड्रग्स अ‍ॅड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा (एनडीपीएस) न्यायालयाने तिघा आरोपींना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अलिशान शर्मा, किरण जंगले आणि किरण कुमार अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (डीआरआय) ने फेब्रुवारी २०१४ मध्ये ९ किलो केटामाईन, साडे तेरा किलो मिथॅम्पफेटामाईन हे अमली पदार्थ जप्त केले होते. लंडनमधून चालवल्या जाणाऱ्या ड्रग्ज माफियांद्वारे भारतातील त्यांच्या हस्तकांद्वारे अन्न पदार्थ असल्याचे घोषित करुन हे अमली पदार्थ लंडनमध्ये निर्यात करण्याचा प्रयत्न केला जात होता. लंडनमधून शिक्षण पूर्ण करुन आलेला व अंधेरी येथील व्यायामशाळेत प्रशिक्षक असलेला  अलिशान शर्मा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. रात्रीच्या विविध पार्ट्यांमध्ये हशीश व मिथॅम्पफेटामाईनचा वापर केला जात असे.

भारतातील विविध भागातील हस्तकांकडून अमली पदार्थ जमा करुन त्याची निर्यात लंडनला केली जात होती. या कामासाठी त्याला विदेशातील व्यक्तीकडून हवालाच्या माध्यमातून मोठी रक्कम मिळत होती. किरण जंगले हा त्याचा साथीदार अमली पदार्थ विविध खाद्य पदार्थाच्या बॉक्समध्ये भरण्याचे काम करत होता. त्यानंतर हे अमली पदार्थ बॉक्समध्ये भरुन कुरिअर कंपनीकडे पाठवण्यात येत होते. त्यांचा तिसरा साथीदार किरण कुमार हा आयटी व्यावसायिक असून डेहराडून येथील निवासी आहे.

हवाला माध्यमातून विदेशातून आलेला पैसा स्वीकारुन कुरिअर कंपन्यांना हे पार्सल विदेशात पाठवण्यासाठी आनलाईन पेमेंट करण्याचे काम तो करत होता. यामुळे समाजाच्या युवा पिढीवर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेऊन एनडीपीएस न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले व त्यांना १० वर्षे सक्तमजुरीची सुनावली आहे.