मागासवर्गीय महामंडळांची एनएसएफडीसी (NSFDC) कार्यान्वित करा 

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक न्याय विभागांतर्गत चालू असलेल्या विविध मागासवर्गीय महामंडळाची एनएसएफडीसी योजना शासनाने पुन्हा कार्यान्वित करावी, आदी मागण्यांचे निवेदन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बचाव कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना देण्यात आले. यावेळी एनएसएफडीसी योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पवार यांनी शिष्टमंडळास दिले.

केंद्र व राज्य शासनाकडून अनुसूचित जाती – जमाती, भटक्या -विमुक्त, इतर मागासवर्गीय नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध आर्थिक विकास महामंडळे स्थापन केली. महामंडळाकडून एनएसएफडीसी योजना सुरू करून गरीब उद्योजकांना कर्जपुरवठा करून मदतीचा हात दिला. परंतु, सध्याच्या सरकारने एनएसएफडीसी योजना बंद केली.

त्यामुळे महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ व अन्य महामंडळांना असलेली एनएसएफडीसी योजना पुन्हा कार्यान्वित करावी. एनएसएफडीसी योजना कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाने हमी घ्यावी, सर्व महामंडळाचे भागभांडवली वाढवून ते दुप्पट करावे आणि बीज भांडवल योजनेतंर्गत ५० टक्के, ४५ टक्के व ५ टक्के ही योजना कार्यान्वित करावी, आदी मागण्यांचे निवेदन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बचाव कृती समितीच्या वतीने अभिमन्यू पवार यांना देण्यात आले.