काश्मीरमध्ये सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांमध्ये ‘चकमक’, हिजबुलचे 3 दहशतवादी ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शोपियांमध्ये सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली यात हिजबुलचे तीन दहशतवादी ठार झाले. आज सोमवारी सकाळी सुरक्षा दलाला या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने या परिसराला घेराव घातला, दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले.

सुरक्षा दलांनी आत्मसमर्पण करण्याची सूचना दिली परंतु जवानांच्या दिशेने दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याची ओळख पटली असून तो आदिल शेख असल्याचे समजते आहे. हा शोपियांचा रहिवासी असल्याचे कळते आहे. पहिल्यांदा तो जम्मू काश्मीर पोलीस आणि एसपीओच्या पदावर कार्यरत होता. नंतर तो हिजबुलच्या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. त्याने 29 सप्टेंबर 2019 मध्ये जवाहरनगर, श्रीनगरमधील पीडीपीच्या तत्कालीन आमदार अजाज मीर यांच्या घरातून 8 शस्त्र लुटले होते.

वसीन वानी नावाचा दुसरा दहशतवादी आहे. तो ही शोपियांचा रहिवासी आहे. तर तिसऱ्या दहशतवाद्याचे नाव जहांगीर मलिक आहे. तो पुलवामा जिल्ह्यातील अचेनमधील रहिवासी आहे.

यापूर्वी 12 जानेवारीला पुलवामामधील त्रालमध्ये लष्कारने केलेल्या कारवाईत 3 दहशतवादी मारले गेले होते. त्यात हिजबुलचा कमांडर हमाद खान देखील होता. हमाद खानवर काश्मीरमध्ये दहशत पसरवण्याची जबाबदारी होती, तो नवा कमांडर बनला होता. तो त्रालचाच रहिवासी होता.

फेसबुक पेज लाईक करा –