नोएडातील यमुना एक्सप्रेसवर एन्काउंटर ! पोलिस गोळीबारात एक गुंड जखमी, दोघे पळाले

नोएडा : दिल्लीच्या जवळील ग्रेटर नोएडामधील यमुना एक्सप्रेसवर आज पहाटे पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. त्यात एक गुंड जखमी झाला असून दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. २५ हजार रुपयांचे बक्षीस असलेला विकास हा जखमी झाला आहे.

पोलीस आणि गुंडांमध्ये यमुना एक्सप्रेसवर ही चकमक झाली. एका कारमधून तीन गुंड येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सेक्टर १३२ मध्ये नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी एका कारमधून तिघे जण तेथे आले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. परंतु, उलट त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला. त्याला पोलिसांनी गोळीबार करुन उत्तर दिले. त्यात विकास जखमी झाला़ मात्र, दोघे पळून गेले. हे गुंड चारचाकीवरुन बसस्थानकावर जाऊन प्रवाशांना गाडीत बसून त्यांना लांब नेऊन लुबाडत असत. त्यांच्याविरुद्ध अशा लुटमारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.