UP : डोक्यावर लाखोंचे बक्षीस असलेल्या कुख्यात गुंड लालू यादवचा ‘खात्मा’

लखनौः वृत्त संस्था – बिहार आणि उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये प्रचंड दहशत असलेल्या कुख्यात गुंड लालू यादवचा बुधवारी (दि. 28) पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल, काडतुसे आणि एक दुचाकी जप्त केली आहे. गुंड लालू यादवच्या विरोधात खून, दरोडा, लुटमार आदीसह 82 गुन्हे दाखल होते. त्याला शोधून देणा-यास पोलिसांनी लाखोंचे बक्षिस ठेवले होते.

अप्पर पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आज पहाटे साडेतीनच्या सुमारास माऊ जिल्ह्यातील सराय लखंसी परिसरातील भंवरेपुरजवळ पोलिसांनी लालू यादवला घेराव घातला. या चकमकीत यादव जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रशांत कुमार म्हणाले की, चकमकीदरम्यान यादवने चिरैयाकोट पोलीस ठाण्याचे अविनाशकुमार सिंग, निरीक्षक राजेश प्रसाद यादव, उपनिरीक्षक अमित मिश्रा आणि कॉन्स्टेबल विवेक सिंग यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. परंतु बुलेट प्रूफ जॅकेट घातल्यामुळे ते सर्वजण बचावल्याचे ते म्हणाले.