‘घोड्या’शी खेळणारे PI दया नायक ‘जात पडताळणी’त रमणार का?

मुंबई : गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले पोलीस निरीक्षक दया नायक यांची गोंदिया येथे जात पडताळणी विभागात बदली झाली आहे. इतकी वर्षे घोड्या शी खेळणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट जात प्रमाणपत्र पडताळणीत रमणार का असा प्रश्न पोलीस दलात चर्चेला आला आहे. याला कारण असे की ७ वर्षांपूर्वी त्यांची नागपूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली होती. परंतु, या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे आता ते गोंदियाला रुजू होतात की आणखी वेगळा निर्णय घेतात, याची चर्चा सुरु झाली आहे.

दया नायक यांची आपल्या जीवनात मोठा संघर्ष केला आहे. कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील येनाहोल्ले गावात ७ वीपर्यंत शिकल्यानंतर ते मुंबईत आले. हॉटेलमध्ये काम करुन ते तेथेच झोपायचे. काम करुन त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या नोकर्‍या करीत अभ्यास करुन ते १९८५ मध्ये मुंबई पोलीस दलात रुजू झाले होते. त्यानंतर युतीच्या शासनकाळात व त्यानंतर अंडरवर्ल्डमधील अनेक कुख्यात गुंडाचा एन्काऊंटर करुन आपला दरारा निर्माण केला होता. त्यातून बॉलीवूडमध्येही एन्काऊंटर स्पेशालिस्टचे आकर्षण निर्माण झाले होते. कर्नाटक येथे २००६ मध्ये नायक यांच्या आईच्या नावाने बांधलेल्या शाळेचे उद्घाटन बिग बॉस अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले होते. त्याचा देशभर बोलबाला झाला़ प्रसिद्धीबरोबरच त्यांच्यावर शासनाची वर्कदृष्टी पडली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्यात आली. २७ वेळा समन्स बजावण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मुंबई पोलीस दलातून त्यांना निलंबित करण्यात आले. ते ६२ दिवस तुरुंगात होते. या काळात त्यांच्या दोन नातेवाईकांचा मृत्यु झाला. चौकशीनंतरही कोणताही बेहिशेबी मालमत्तेचा पुरावा न मिळाल्याने त्यांची त्यातून सुटका करण्यात आली़ मानवाधिकार आयोगाकडे त्यांनी दाद मागितली. त्यावर आयोगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एकूण कारभारावर नाराजी व्यक्त करुन शासनाला २५ हजार रुपये दंड केला. तत्कालीन महिला आयपीएस अधिकार्‍यांच्या पगारातून कापण्याचा आदेश दिला.

त्यानंतर त्यांना २०१२ मध्ये पुन्हा रुजू करुन घेण्यात आले. जानेवारी २०१४ मध्ये त्यांची नागपूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली. कुटुंबाच्या सुरक्षेच्या कारणास्तव या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आले. वर्षभरानंतर त्यांना पुन्हा रुजू करुन घेण्यात आले. सध्या ते मुंबई एटीएसमध्ये कार्यरत आहेत. सचिन वाझे प्रकरणानंतर अशा बड्या कॉपची वर सरकारने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. अशा वर्दीपेक्षा मोठ्या झालेल्यांची महत्वाच्या पदावरुन बदली करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. त्यातूनच दया नायक यांची गोंदियाला बदली करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या पोलीस खात्यातील कार्यात मुंबई व परिसरातच काम केलेले दया नायक आता गोंदियाला बदली स्वीकारतील का की आणखी वेगळा निर्णय घेतील, असा उलटसुलट चर्चा पोलीस दलात सुरु झाली आहे.