नेपाळच्या भूभागावर चीनकडून अतिक्रमण !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकणार्‍या चीनने आता नेपाळला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. चीनने नेपाळलगत सीमेवर 11 इमारतींचे बांधकाम केले आहे. हुमला जिल्ह्यातील या प्रकारामुळे नेपाळने चीनवर अतिक्रमणाचा आरोप केला आहे. दोन्ही देशांत सीमावाद निर्माण झाला आहे.

नेपाळने काही वर्षांपूर्वी या भागात एक रस्ता बांधला तेव्हापासून सीमेवर असलेला खुणेचा खांबच नष्ट केला. आता चीनने तेथे इमारती बांधल्या आहेत. 2005 मध्ये या भागात झोपड्या होत्या. चीनने हा भूभाग आपला असल्याचा दावा केला आहे. दक्षिण सीमेवर चीनने 1 कि.मी. परिसरात अतिक्रमण करून इमारती बांधल्या आहेत. नेपाळचे पथक सीमेवर पाहणीसाठी आले तेव्हा चीनच्या सुरक्षा दलाचे जवान ट्रक, टँकर व जीपने तेथे आले.

त्यांनी नेपाळी अधिकार्‍यांशी बोलून त्यांना चर्चेसाठी सीमेवर बोलावले. तमांग यांनी सांगितले की, तो भाग नेपाळचाच आहे; पण चीनने नकाशे दाखवून तो त्यांचाच असल्याचे स्पष्ट केले. हुमला व नामखा या भागांत नेपाळच्या गृह मंत्रालयाने पथके पाठवली होती. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.