शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या चौकशीसाठी ED-CBI ची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सरनाईक हे रडारवर असून त्यांचा शोध ईडी आणि सीबीआयचे अधिकारी घेत आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी सक्तवसुली संचलनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) लोणावळा येथील एका रिसॉर्टवर संयुक्तरित्या छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआय आणि ईडीचे अधिकारी काही वेळेपूर्वी याठिकाणी पोहचले असून प्रताप सररनाईक यांचा शोध सुरु आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआय आणि ईडीने प्रताप सरनाईक यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यासाठी हे शोधसत्र सुरु केले आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही वेळापूर्वी ट्विट करुन प्रतास सरनाईक गायब असल्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांनी ट्विटमध्ये, ‘प्रताप सरनाईक कुठे आहात !!?? गायब !!?’ असे ट्विट केले आहे. या कारवाईबाबत काही वेळातच अधिकृत माहिती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीतून आलेल्या विशेष ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर छापा टाकला होता. सरनाईक यांच्याशी संबंधीत 10 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग याला चौकशीला बोलावले होते. मात्र, परदेशातून आल्यामुळे सरनाईक कुटुंबीय क्वारंटाईन झाले होते. त्यानंतर सरनाईक यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी त्यांची ईडीने सलग 5 तास चौकशी केली होती.