22 हजार कोटींचा SRA घोटाळा, ED कडून ‘ओमकार’ रियल्टर्सचे कमल गुप्ता आणि बाबू वर्मा ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावावर 22000 हजार कोटींची अपरातफर केल्या प्रकरणी ईडीने ओमकार समूहाचे अध्यक्ष कमल नाथ गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबू लाल वर्मा यांना बुधवारी (दि.27) अटक केली आहे. ओमकार समूह झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रात आघाडीवर आहे. गुरुवारी त्यांना PMLA कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ओमकार रियल्टर्स या कंपनीत जवळपास 22 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.

ईडीने सोमवारी ओमकार रियल्टर्स कार्यालयावर छापे टाकले होते. तसेच ओमकार समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घराची झडती घेतली होती. एकाचवेळी दहा ठिकाणी छापे पडल्यामुळे बांधकाम व्यवसायात एकच खळबळ उडाली होती. या छाप्यात ईडीच्या हाती अनेक गोपनीय कागद लागले आहेत. त्यानुसार चौकशीनंतर आज कमल नाथ गुप्ता यांना अटक करण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. चौकशीत सहकार्य न केल्या प्रकरणी ईडीने गुप्ता आणि वर्मा यांना ताब्यात घेतले आहे.

ओमकार समुहाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी येस बँकेकडून 450 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र हे पैसे इतरत्र वळवल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवर खर्च केल्याचे दाखवून कोट्यावधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप या समूहावर ठेवण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावावर 22 हजार कोटी रुपयांची अफरातफर केल्या प्रकरणी ईडीने तपास सुरु केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

ओमकार विरोधात न्यायालयात याचिका दाखल
जोगेश्वरी परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावावर ओमकार समूह आणि गोल्डन एज समूह यांनी मिळून 22 हजार कोटी रुपये कर्ज घेतले. मात्र, कर्ज व्यवहार होऊन 9-10 महिने झाले तरी घरे बांधली नाहीत, असा आरोप करत एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन आणि सक्तवसुली संचालनालयाला त्यांची बाजू मांडण्याचा आदेश दिला. त्यानंतर ईडीने ओमकार समूहाशी संबंधित दहा ठिकाणी छापे टाकले.