इक्बाल मिर्ची प्रकरण : ED च्या प्रकरणात मोठा खुलासा, काँग्रेस नेत्यांना दिले गेले पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गॅंगस्टर इकबाल मिर्ची केसमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मारलेल्या छाप्यांत मोठा खुलासा झाला आहे. इकबाल मिर्ची प्रकरणी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावे पुढे आली आहेत. सूत्रांच्या मते यात हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांशी व्यवहार झाल्याचे कळत आहे. इकबाल मिर्ची केसमध्ये सहाना गुपचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात गुरुवारी मारलेल्या छाप्यात ईडीला काही महत्वाचे दस्तावेज सापडले. छापेमारीमध्ये सापडलेल्या दस्तावेजात सुधाकर शेट्टी आणि अनेक नेत्यांमध्ये व्यवहार झाल्याचा खुलासा झाला आहे.

हरियाणाचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे काही माजी मंत्र्याकडील पैशांच्या व्यवहाराची माहिती ईडीच्या हाती लागली आहे. तपासात खुलासा झाला की हरियाणाच्या एक माजी सीएमच्या नातेवाईकाच्या विवाहात सुधाकर शेट्टींनी कोट्यावधी रुपये खर्च केले होते. शेट्टी आणि एक दिग्गज नेत्यांमध्ये मुंबईच्या जुहू भागात एका जमिनीचा सौदा झाला होता. ईडीच्या माहितीनुसार या नेत्यांशी संबंधामुळे सुधाकर शेट्टींनी त्यांना अनेकदा हॅलिकॉप्टर्सची मोफत सेवा दिली होती.

याप्रकरणी ईडीने सुधाकर शेट्टींची चौकशी देखील केली आहे. शेट्टींकडून मिळालेल्या उत्तराने ईडी संतुष्ट नाही. शेट्टी यांची पुन्हा एकदा चौकशी केली जाईल. छापेमारीत ईडीने शेट्टींच्या बँक खात्याची माहिती, कंपनीसंबंधित दस्तावेज, पेन ड्राइव्ह आणि कंप्युटर हार्ड डिस्क जप्त केली आहे.