नीरव मोदीच्या ‘घड्या’, ‘गाड्या’ आणि ‘पेंटिंग’चा होणार ‘लिलाव’, ईडी’नं केलं स्पष्ट

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार ४०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांचा सूत्रधार फायरस्टोन डायमंड कंपनीचा मालक निरव मोदी याच्या जप्त केलेल्या महागड्या कार, लाखो रुपये किमतीच्या घड्या आणि अन्य महागड्या वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. ईडीनं या वस्तूंची लिलावाची जबाबदारी मुंबईमधील सैफरन आर्ट्सकडे दिली असून हा लिलाव २७ फेब्रुवारीला होणार असून त्यानंतरचा दुसरा लिलाव हा ३ व ४ मार्च रोजी केला जाणार आहे.

दरम्यान पहिल्यांदाच ईडीनं एखाद्या प्रोफेशनल लिलाव हाऊसला ही जबाबदारी सोपविली आहे. मागील वर्षी मार्चमध्ये देखील सैफरन आर्ट्सनं आयकर विभागासाठी निरव मोदींच्या पेंटीग्सचा लिलाव केला होता. या लिलावातून तब्बल ५४.८४ कोटी रुपये जमवले होते. तसेच या दोन्ही लिलावांमध्ये देशातील कलाकारांच्या दर्जेदार अशा १५ कलाकृतींचा देखील समावेश असणार आहे. यात १९३५ मधील अमृता शेरगील यांनी बनवलेला एक मास्टरपीस देखील असणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या पेंटिंगचा कधीच लिलाव झालेला नाही.

तसेच एमएफ हुसैन यांच्या महाभारत सिरीजमधील एक ऑयल ऑन कॅन्हॉस चा लिलाव होणार आहे. या दोन्ही पेंटिंग्सची किंमत १२ ते १८ कोटी च्या आसपास आहे. तसेच दोन्ही लिलावांसाठी एक कॅटलॉग देखील तयार करण्यात येणार आहे. या लिलावामध्ये अमृता शेर-गिल, एमएफ हुसैन आणि व्ही. एस. गायतोंडे यासारख्या गाजलेल्या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश केला जाणार असल्याचे सैफरन आर्ट्सचे सीईओ आणि सह संस्थापक दिनेश वजिरानी यांनी दिली. विशेष म्हणजे या लिलावामध्ये नीरव मोदीच्या पोर्श पनामरा आणि रॉयल गोस्ट या महागड्या कारचा देखील लिलाव करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा –