ईडीने आवळला ‘फास’ ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला ईडीने दुसऱ्यांदा बजावले समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या हवाई वाहतूक घोटाळ्याप्रकरणी एअर इंडिया संबंधित प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे. आधीच्या समन्समध्ये ईडीसमोर हजर राहण्यासाठी त्यांना ६ जून ही तारीख देण्यात आली होती. मात्र तेव्हा ते ईडीसमोर हजर राहिले नाहीत. आता त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहेत.

राज्यसभेचे सदस्य असलेले पटेल यांना ६ जून रोजी सकाळी ११ वाजता या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यापुढे हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे ‘ईडी’समोर उपस्थित राहणे शक्य नाही असे कारण देत प्रफुल्ल पटेल गैरहजर राहिले होते. आता ईडीने प्रफुल्ल पटेल यांना १० किंवा ११ जून रोजी हजर रहाण्यासंबंधी समन्स बजावले आहेत.

काय आहे प्रकरण –

हवाई वाहतूक उद्योगातील लॉबिस्ट दीपक तलवार याला आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी काही महिन्यांपूर्वी अटक झाली होती. दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे. तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले असल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला होता.

माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा दीपक तलवार हा चांगला मित्र होता, असे देखील न्यायालयाने म्हटले होते. तलवार हा पटेल यांच्या नियमितपणे संपर्कात होता, असे देखील त्यात म्हटले होते. अटक करण्यात आलेल्या तलवारने एमिरेट्स आणि एअर अरेबियाच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांना संबोधित केलेल्या अनेक पत्रांना अंतिम रूप दिले, असाही दावा ईडीने आरोपपत्रात केला होता. दीपक तलवारच्या अटकेनंतर प्रफुल्ल पटेल यांची देखील चौकशी होणार, अशी शक्यता होती.