क्रिकेटमध्ये सर्वकाही शक्य ! वनडे क्रिकेटमधील तुफानी मॅच, मॅक्सवेल-कॅरीनं करून दाखवलं

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था –  कोरोना वायरसच्या संकटात इंग्लंडच्या संघाने सर्व प्रथम क्रिकेट खेळायला सुरुवात केली. प्रथम वेस्ट इंडिज नंतर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे तीन देश इंग्लंडमध्ये खेळून गेले.ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडने प्रत्येकी ३ सामन्यांची टी-२० आणि वनडे मालिका खेळली. यातील अखेरचा वनडे सामना काल बुधवारी खेळवण्यात आला. मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्याने कालच्या सामना हा निर्णायक ठरणार होता. इंग्लंडकडून प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ७ बाद ३०२ धावा करण्यात आल्या.इंग्लंडची सुरूवात तशी खराबचं झाली.मिशेल स्टार्कने सामन्यातील पहिल्या दोन चेंडूत दोन विकेट घेतल्या.पण त्यानंतर जॉनी बेयरस्टोने १२६ चेंडूत १२ चौकर आणि दोन षटकारांसह ११२ धावा केल्या. सॅम बिलिंग्स याने त्याला उत्तम साथ देत ५८ चेंडूत ५६ धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी तेव्हा झाली जेव्हा इंग्लंडची अवस्था ४ बाद ९० अशी होती. त्यानंतर ख्रिस वोक्सने ३९ चेंडूत नाबाद ५३ धावा ठोकल्या.

ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने सामन्याच्या पहिल्या २ चेंडूवर जेसन रॉय आणि जो रुटला बाद केले. यामुळे इंग्लंडची अवस्था शून्यावर २ बाद अशी झाली होती. २००५ च्या वनडे क्रिकेटनंतर दुसऱ्यांदा असे घडले कि पहिल्या ओव्हरच्या दोन चेंडूवर दोन विकेट पडल्या. २०१३ साली झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यातसुद्धा असे पाहायला मिळाले होते.

जॉनी बेयरस्टोचा नवा विक्रम

इंग्लंडकडून शतक करणाऱ्या जॉनी बेयरस्टोने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १० शतक करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. असे करणारा तो चौथ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने भारताचा सलामीवीर शिखर धवन याला मागे टाकले आहे. शिखर धवनने हि कामगिरी ७७ डावांत पुंर्ण केली तर जॉनी बेयरस्टोने ती ७६ डावांत पूर्ण केली. या यादीत ५५ डावात ही कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक पहिल्या क्रमकांवर आहे.

इंग्लंडने निम्मा विजय मिळवला होता, पण…

प्रथम फलंदाजी करत ३०२ धावा केल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी झटपट विकेट घेत कमाल केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद ७३ अशी केली. निम्मा संघ बाद झाल्यांनतर ऑस्ट्रेलियाला ३०३ धावांचे आव्हान पेलणे अवघड झाले होते. पण तेव्हा ॲलेक्स कॅरी आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी चांगली फलंदाजी करत सामन्याचे रूपचं बदलून टाकले. या दोघांनी मिळून ६व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.ॲलेक्स कॅरीने १०६ तर ग्लेन मॅक्सवेलने १०८ धावा केल्या.

जोफ्रा आर्चरची ही चूक इंग्लंडला महागात पडली

इंग्लंडचा संघ विजयाच्या दिशेने जात असातना जोफ्रा आर्चरकडून एक चूक घडली. जेव्हा ॲलेक्स कॅरी १७ चेंडूत ९ धावांवर खेळत होता. तेव्हा आर्चरने त्याला बाद केले पण नंतर तिसऱ्या अंपायरने आर्चरचा पाय क्रीज बाहेर असल्याचे सांगितले आणि नो बॉल दिला. या जीवनदानाचा कॅरीने फायदा घेतला आणि १४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह १०६ धावा केल्या.कॅरीने दमदार खेळीसह आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कॅरी आणि मॅक्सवेल यांनी सहाव्या विकेटसाठी २१२ धावांची विजयी भागीदारी केली.

ॲलेक्स कॅरीचा नवा विक्रम

ॲलेक्स कॅरीने या सामन्यात आंतरराष्ट्रीय वनडेमधील पहिले शतक झळकावले. याआधी वनडेमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३७ होती.ऑस्ट्रेलियाकडून एका दशकात शतक करणारा तो दुसरा विकेटकीपर ठरला आहे.

मॅक्सवेलचा वर्ल्ड रेकॉर्ड

या सामन्यात मॅक्सवेलने वनडे क्रिकेटमधील ३ हजार धावाचा टप्पा पार केला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने इतकी धावसंख्या करण्याचा विक्रम मॅक्सवेलने स्वत:च्या नावावर केला. त्याने २ हजार ४४० चेंडूत ३ हजार धावा केल्या. हा विक्रम याआधी जोस बटरलच्या नावावर होता.त्याने २ हजार ५३२ चेंडूत ही कामगिरी केली होती.

पाच वर्षात पहिल्यादा वनडे मालिका गमावली…

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ३ विकेटनी विजय मिळवत मालिका २-१ने जिंकली. यासह इंग्लंड संघाने तिसऱ्या वनडेसह मालिका देखील गमावली. इंग्लंड संघाने पाच वर्षानंतर घरच्या मैदानावर वनडे मालिका गमावली. याआधी इंग्लंड संघाकडुन घरच्या मैदानावर आयर्लंड, पाकिस्तान, भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांचा पराभव करण्यात आला होता.