5 हजाराची लाच घेताना ‘पंटर’सह महावितरणचा अभियंता ACB च्या जाळ्यात !

पोलिसनामा ऑनलाईन, इचलकरंजी : वीज कनेक्शन दिल्याबद्दल बक्षीस म्हणून 5 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरण कंपनीच्या कबनूर शाखेतील एका सहाय्यक अभियंत्यासह पंटरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

सहाय्यक अभियंता अमर बाळासो कणसे (वय 30, रा. अवधूत आखाडा) आणि पंटर हारुण रशिद इब्राहीम लाटकर (40, आवळे चौक, झोळ कारखाना परिसर) असे लाचखोरांचे नावे आहेत.

रशिद लाटकर यांने ही लाच घेतली आहे. तसेच यातील 2 हजार रुपये कणसे याच्यासाठी 3 हजार रुपये स्वतःसाठी घेतल्याचे कबूल केले आहे. लाटकर याच्या न्यू भारत लाईट हाऊस या दुकानात ही लाच घेताना पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकांने आज दुपारी ही कारवाई केली.

या प्रकरणातील तक्रारदार यांनी फर्निचर व्यावसायासाठी कबनूरमधील मराठी शाळेजवळ भाड्याच्या जागेवर शेड उभारलं आहे. या शेडमध्ये थ्री फेजच्या वीज कनेक्शनची मागणी महावितरणच्या कबनूर शाखेकडील सहाय्यक अभियंता कणसे याच्याकडे केली होती. त्यांनी लाटकर यांना भेटण्याचा सल्ला तक्रारदारांना दिला. त्यानुसार तक्रारदारांनी लाटकर यांना भेटल्यानंतर मीटर मंजूर केल्यानंतर 5 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते.

दरम्यान, तक्रारदारांनी दिलेल्या अर्जानुसार रितसर प्रक्रीया करुन वीज कनेक्शन दिले. त्यानंतर लाटकर यांने तक्रारदाराशी संपर्क साधून तुमचे मीटर मंजूर झाले असून 5 हजार देण्याची मागणी केली.

याबाबत तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची दोनवेळा पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचला. यात लाटकर हा कणसे याच्यासाठी 5 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

वीज कनेक्शन दिल्याबद्दल बक्षीस म्हणून 5 हजार रुपये घेतले असून त्यातील दोन हजार रुपये कणसे याच्यासाठी घेतल्याचे लाटकर यांने कबूल केले आहे. या प्रकरणी दोघानांही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस उपअधीक्षक बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या कारवाईत पोलिस निरिक्षक युवराज सरनोबत, हवालदार शरद पोरे, विकास माने, नवनाथ कदम, सुनील घोसाळकर सहभागी झाले होते.