२२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना सा. बां. विभागाचा शाखा अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ग्रामपंचायतीच्य़ा केलेल्या कामाचे बील मंजूर करण्यासाठी २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या दौंड बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले.

संतोष रामचंद्र गांधी (वय ५२, शाखा अभियंता, दौंड बांधकाम विभाग, जिल्हा परिषद) असे त्याचे नाव आहे. याप्रकऱणी ३० वर्षीय ठेकेदाराने तक्रार केली आहे.

तक्रारदार हे ठेकेदार आहेत. त्यांनी पारगाव ग्रामपंचायतीचे काम केले होते. त्या कामाचे ७ लाख ५० हजार रुपयांचे बील होते. ते बील मंजूर करून देण्यासाठी दौंड बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संतोष गांधी यांनी त्यांना बिलाच्या ३ टक्के म्हणजेच २२ हजार ५०० रुपये रकमेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार अँटी करप्शनकडे केली. अँटी करप्शनने याची पडतळाणी करून सापळा रचला. तेव्हा संतोष गांधी याला पुण्यातील पर्वती येथील त्याच्या घरी २२ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.

एखाद्या लोकसेवकाने लाच मागितल्यास त्याची तक्रार अँटी करप्शनच्या १०६४ या क्रमांकावर करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.

ही कारवाई अँटी करप्शनचे पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे, पोलीस नाईक गिरीगोसावी, पोलीस नाईक नवनाथ माळी, पोलीस कॉन्सटेबल अंकुश आंबेकर, सहायक पोलीस फौजदार जाधव यांच्या पथकाने केली.