टीव्ही मालिकेत काम देण्याच्या बहाण्याने अभियंत्याने केली नवकलाकारांची फसवणूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही वरील मालिकांमध्ये काम देतो अशी बतावणी करून ७० ते ७५ नवकलाकारांची फसवणूक करण्यात आली आहे. सिंटा प्रा. लि.चे पदाधिकारी असल्याचे भासवून या भामट्यांनी या नवकलाकारांकडून ईमेलद्वारे बनावट करारनामे पाठवून त्यांच्याकडून नेटबँकिंग आणि पेटीएमद्वारे पैसे स्वीकारले होते.

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने अविनाश शर्मा (२४) आणि विनोद भंडारी (३०) या दोन आरोपींना अटक केली आहे. अविनाश शर्मा हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. या दोघांनी आदित्य व श्रुती जैन नावाचा वापर करून संगमताने सिने कलाकारांच्या सिंटा प्रा. लि.चे पदाधिकारी असल्याचे भासवून नवकलाकारांना स्टार टीव्हीनिर्मित कृष्ण चली लंडन व इतर मालिकांमध्ये भूमिका देण्याची बतावणी केली.

या भूमिकेसाठी निवड झाल्याचे भासविण्यासाठी बनावट करारनामे ईमेलद्वारे पाठवून त्यांच्याकडून नेटबँकिंग व पेटीएमद्वारे पैसे स्वीकारले. मात्र, पैसे स्वीकारल्यानंतर मालिकेत भूमिका न दिल्याने कलाकारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर कक्ष ९ ने ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या.