इलेक्ट्रिकल इंजिनिअरची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने घरून काम करण्याची वेळ आली. मात्र घरुन काम करताना योग्य सुविधा नसल्याने आलेल्या तणावातून (work-from-home-pressure) एका इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या (suicide) केल्याचं समोर आलं आहे. गुजरातमध्ये ही घटना घडली आहे.

जिगर गांधी असं आत्महत्या केलेल्या इंजिनिअरच नाव आहे. तो नोएडा येथील कंपनीत काम करत होता. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इलेक्ट्रिकल इंजिनिअर असणाऱ्या या तरुणाने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरुन काम करताना येणारा दबाव सहन न झाल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

जिगरचा डिसेंबर महिन्यात साखरपुडा होणार होता. नोएडा येथील एका कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून तो काम करत होता. दोन महिन्यांपूर्वी तो घरी परतला होता आणि घरुनच काम करत होता. जिगर गेल्या काही दिवसांपासून घरून काम करावं लागत असल्याने किती तणाव असतो याबद्दल सांगत होता अशी माहिती त्याच्या कुटुंबाने पोलिसांना दिली आहे. शवविच्छेदन अहलावात गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.