8000 हजाराची लाच घेताना महावितरणचा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – बोअरवेलच्या मोटार स्टार्टरवर कारवाई न करण्यासाठी 8 हजार रुपयाची लाच घेताना सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील वीज वितरण केंद्रातील कनिष्ठ अभियंता व एक खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी करण्यात आली.

कनिष्ठ अभियंता पंकज अशोक अटकमवार (वय-32) आणि खासगी इसम प्रकाश बालय्या येरोला (वय-38) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या घराच्या बोअरवेलमधून पाणी घेण्यासाठी लावण्यात आलेल्या मोटारचा स्टार्टर करवाई न करता परत देण्यासाठी पंकज अटकमवार याने 10 हजार रुपयाची मागणी केली. तडजोडीमध्ये 8 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने सापळा रचून 8 हजार रुपयाची लाच घेताना खासगी इसम प्रकाशला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ही लाच कनिष्ठ अभियंता पंकज अटकमवार यांच्यासाठी स्विकारल्याचे सांगितले. पोलिसांनी पंकज अटकमवार याला अटक केली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक यशवंत राऊत, पोलीस हवालदार प्रमोद ढोरे, नत्थू धोटे, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, घनश्याम वडेट्टीवार यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/