केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय ! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता मातृभाषेतून शिक्षण घेता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंजिनिअरिंगचे ( Engineering) शिक्षण (Education) घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूश खबर असून, यापुढे त्यांना मातृभाषेत (Mother Tongue) शिक्षण घेता येणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होणार असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्याबाबत निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून देशातील काही निवडक आयआयटी (IIT) आणि एनआयटीमधून (NIT) मातृभाषेतून शिक्षणाची सुरुवात करण्यात येणार आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल ( Ramesh Pokhriyal) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी शिक्षणाबाबत पुढील शैक्षणिक वर्षापासून मातृभाषेत शिक्षण घेता येणार असून, याबाबत देशातील निवडक आयआयटी आणि एनआयटी संस्थांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

जेईईची ( JEE) परीक्षाही मातृभाषेत होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संस्था शालेय शिक्षण मंडळाच्या विद्यमान परिस्थितीचा आढावा घेऊन स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासक्रम ठरवणार आहे. याशिवाय जेईईच्या परीक्षा इंग्रजी आणि हिंदी याव्यतिरिक्त ९ स्थानिक भाषांमधून ही परीक्षा होणार आहे. यामुळे मोठा दिलासा मिळणार असून, विद्यार्थ्यांना अभ्यास करणे आणि परीक्षा देणे सोपे जाणार आहे.

You might also like