‘या’ कामासाठी MBA, ENGINEER’S, M.Tech वाल्यांचे अर्ज

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप मोठी आहे. यातही तरुणांना सरकारी नोकरीचे अधिक आकर्षण आहे. बेरोजगारीचे देशातील वास्तव खरंच भीषण आहे. यापूर्वी मुंबईतील महापलिककेच्या कँटिनमधील वेटरच्या पदासाठी इंजिनिअर आणि पदवीधर तरुणांचे अर्ज आले होते. आता तामिळनाडूतील विधानसभेत सफाई कामगारांच्या १४ जागांकरिता चक्क एम. टेक, बी टेक, एमबीए, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या तरुण-तरुणींनी अर्ज केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान २६ सप्टेंबरला तामिळनाडू विधानसभा सचिवालयाने ही पदे भरण्यासाठी अर्ज मागवले होते. अर्ज करणारा उमेदवार शारीरिक दुष्टया तंदुरुस्त असावा तसेच त्याने वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली असावीत या दोनच अटी ठेवण्यात आल्या होत्या. एम्पलॉयमेंट एक्सचेंजकडून तामिळनाडू सचिवालयाला ४,६०७ अर्ज प्राप्त झाले आहेत. निकषात न बसणारे फक्त ६७७ अर्ज फेटाळण्यात आले.

२०१७ -१८ मध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा रोजगारासंबंधी अहवाल लीक झाला होता. त्यामध्ये मागच्या ४५ वर्षात २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक होता असे या अहवालात म्हटले होते. पण नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी हा अहवाल फेटाळून लावला. अहवालातील नोकऱ्या संदर्भातील माहिती अधिकृत नसून त्याची पडताळणी झालेली नाही असे नीती आयोगाकडून सांगण्यात आले होते.

You might also like