अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला ‘कोरोना’ची बाधा, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली माहिती

हंबनटोटा : वृत्तसंस्था – श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेलेल्या इंग्लंड (England) क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली (Moeen ali) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. मोईन अली रविवारी (दि. 3) आपल्या संघासोबत श्रीलंकेला पोहोचला होता. तेव्हा त्याची PCR चाचणी घेण्यात आली. संबंधित माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

श्रीलंकेमध्ये इंग्लंड आणि श्रीलंका दरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दोन कसोटी सामन्यांसाठी मोईन अलीची संघातील भूमिका महत्त्वाची होती. पण मोईन अलीला आता कोरोनाची बाधा झाली असल्याने त्याच्या ठिकाणी इंग्लड संघात कोण खेळणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रविवारी (दि. 3) हंबनटोटाच्या विमानतळावर इंग्लंडच्या संघाचे आगमन झाले. त्यानंतर खेळाडूंची PCR चाचणी झाली. चाचणीत मोईन अलीला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. याची पुष्टी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने केली आहे. त्यामुळे मोईन अलीला आता श्रीलंका सरकारच्या विलगीकरणाच्या प्रोटोकॉलनुसार 10 दिवस अलग राहावे लागणार आहे.

दरम्यान पूर्ण प्रवासात क्रिक्स वोक्स त्याच्या नजीक बसल्याने त्यानंही स्वतःला क्वारंटाइन करुन घेतले आहे. उद्या सकाळी पून्हा एकदा पाहुण्या संघाची PCR चाचणी होणार आहे. त्यानंतरचं हा संघ प्रॅक्टीससाठी मैदानात उतरेल.

दोन्ही कसोटी सामन्यांना मुकणार ?
मोईन अली पहिला कसोटी सामना खेळणार की नाही ? हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पण पुढील दहा दिवस म्हणजेच 13 जानेवारीपर्यंत मोईन अलीला विलगीकरणात राहावे लागणार आहे. तसेच पहिला कसोटी सामना 14 जानेवारीला सुरू होणार आहे. त्यामुळे मोईन अली पहिला सामना खेळणार की नाही ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण त्यानंतर हे दोन्ही संघ 22 ते 26 जानेवारी दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळं दुसऱ्या कसोटी सामन्यात मोईल अली खेळण्याची दाट शक्यता आहे.