भारताचा विजय अवघ्या एका धावेने हुकला 

गुवाहटी : वृत्तसंस्था – भारतीय महिला संघाचा पराभव करून इंग्लंडने (टी-२०) ३ सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाचा अवघ्या एका धावेने पराभव झाला आहे. इंग्लंडच्या संघाने विजयासाठी १२० धावांचे आव्हान ठेवले  होते.

गुवाहटीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी – २० सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची अवस्था एक बाद ५१ धावांवरुन ३ बाद ५४ धावा अशी झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज एमी जोन्सने २१ चेंडूत २६ धावांची खेळी करुन इंग्लंडला १०० च्या जवळ पोहचवले. पण, त्यानंतर आलेल्या फलंदाजांना फार काही करता आले नाही. त्यामुळे इंग्लंडला २० षटकात ६ बाद ११९ धावाच करता आल्या. भारताकडून अनुजा पाटीलने ४ षटकात १३ धावा देत महत्वाच्या २ विकेट घेतल्या. याचबरोबर हरलीन देओलनेही २ षटकात २ बळी घेतले.

भारतीय महिला संघाची सुरुवातही खराब झाली. हरलीन देओल अवघी १ धाव काढून बाद झाली . यानंतर कर्णधार स्मृती मंधानाने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. इंग्लंडच्या फक्त ११९ धावांचा पाठलाग करताना कर्णधार स्मृतीच्या झुंजार अर्धशतकी खेळीनंतरही भारताला विजयापासूनदूर रहावे लागले.  भारताला अखेरच्या षटकात फक्त ३ धावा करायच्या होत्या . पण, क्रॉसने अखेरच्या षटकात फक्त १ धाव देत भारताचे दोन फलंदाज बाद केले. भारताला २० षटकात ११८ धावाच करता आल्याने अवघ्या १ धावेने पराभव झाला.