जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून केराची टोपली, शिक्षण विभाग गंभीर

पुणे : (लोणी काळभोर) पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील दक्षिण व पूर्व भागात परतीच्या पावसाने धुमाकुळ घेतल्यानंतर उद्भवलेल्या पुरवठा परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी हवेली तालुक्यातील प्राथमिक माध्यमीक व महाविद्यालय यांना सुट्टी जाहिर केली परंतू पूर्व हवेलीतील काही मुजोर इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली. यामुळे काही शाळा गेली दोन दिवस बंद तर काही चालू असल्याचे चित्र होते.

पूर्व हवेलीतील थेऊर, लोणी काळभोर, आळंदी म्हातोबा, तरडे, वळती, शिंदवणे, उरुळी कांचन आदी गावात परतीच्या पावसाने गेल्या चार पाच दिवसात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर महसूल विभागासह शासन हरकतीत आले असून तहसीलदार सुनील कोळी यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. कुंजीरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कुंजीर यांनी आपले सहकरी अनिल जगताप, वैभव गावडे, श्रीधर कुंजीर, प्रकाश कुंजीर, काळूराम कुंजीर यांच्यासह आज तहसीलदार सुनील कोळी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या भागात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहिर केली परंतू पूर्व हवेलीतील अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सुट्टी दिली नाही.

या शाळांकडून कायमच शासनाच्या सूचनाची पायमल्ली होते. यावर शिक्षण विभागाकडून चौकशी करुन कारवाई होणार आहे. लवकरच चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे असेही सुत्राकडून कळले आहे.
यावर तालुका शिक्षणाधिकारी रामदास वालझडे यांच्याशी याबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की हा प्रकार गंभीर आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन सर्वच शाळांनी करणे आवश्यक आहे यावर संबंधित शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल असे सांगितले.