‘इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांची फी पालकांनी न दिल्यास शाळा बंद कराव्या लागतील’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विना अनुदानीत शाळांच्या विद्यार्थ्यांची फी पालकांनी न दिल्यास संस्था चालकांना शाळा बंद कराव्या लागतील. तसेच, विनाअनुदानीत संस्था या विद्याद्यार्थ्यांच्या फीवरच अवलंबून असतात. शिक्षकांना गेल्या चार महिन्याचे पूर्ण पगार देण्यात आलेले आहेत. त्याकरिता संस्थांनी कोट्यावधी रुपये खर्च केला आहे. कॉर्पोरेशन टॅक्स, लाईट बील, टेलिफोन बिल इतर सर्व खर्च संस्थेस करावे लागतात. या सर्व गोष्टींचा पालकांनी विचार करणे गरजेचे असल्याचे मत कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

वालचंद संचेती म्हणाले, शिक्षक आजही शिकविण्याकरिता जीवापाड मेहनत घत आहेत. ऑनलाईन शिक्षण देत आहेत. गेल्या चार महिन्यात बुडालेला अभ्यासक्रम ते भरून काढणार आहेत, अशा वेळी शिक्षकांना पगार न देणं कितपत योग्य आहे ? याचा विचार करणे गरजेचे आहे. शासनाने देखील या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. खोट्या, लोकप्रिय घोषणा करुन संस्थांना अडचणीत आणू नये असे त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा कॉलेज महाविद्यालये बंद आहे. काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. तसेच पालकांना फी भरण्यासाठी शाळांनी तगादा लावू नये असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणीक संस्था चालक अडचणीत सापडले आहे. अडचणीत सापडलेल्या शिक्षण संस्थांना शासनाने मदत करावी अशी मागणी संस्था चालकांकडून होत आहे.