दारू अन् इंग्रजी बोलण्याचा संबंध आहे का? ‘इथं’ झालं संशोधन

लंडन : वृत्तसंस्था – एखादी व्यक्ती नशेत असते तेव्हा दारु न पिता जितकं इंग्लिश बोलू शकतो त्यापेक्षा सहज बोलतो असं दिसतं. गंमतीनं असंही म्हटलं जात की दारु प्यायल्यावर इंग्रजी फाडफाड बोलायला सुरुवात होते. दारुच्या नशेत लोक कधी काय बोलतील किंवा काय करतील हे सांगणं थोडं कठीणच. जे दारु न पिता इंग्रजी येत असून बोलताना अडखळतात ते नशेत मात्र धडाधड बोलत सुटतात. आता यावर चक्क संशोधन झालं आहे. संशोधनातून अशी माहिती समोर आलीय की दारुच्या नशेत इतर भाषा शिकताना मदत होते.

युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल, ब्रिटनमधील एका कॉलेजने आणि नेदरलँडसच्या युनिव्हर्सिटी ऑफ मास्ट्रिचमध्ये याबाबत संशोधन करण्यात आलं. संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की, लिग्विस्टिक प्रोफिसिएन्शी दारुच्या नशेमुळे वाढते. यामध्ये डच भाषा शिकणाऱ्या ५० जर्मन लोकांच्या एका गटाची संशोधनासाठी निवड करण्यात आली होती. यापैकी काही लोकांच्या पेयामध्ये कमी प्रमाणात अल्कोहल मिसळलं तर काही लोकांना नॉर्मल ड्रिंक देण्यात आलं होतं.

दारु मिसळलेलं ड्रिंक प्यायल्यानंतर जर्मन लोकांच्या गटाला नेदरलँडमधील लोकांसोबत डच भाषेत बोलण्यास सांगितलं. यातून अशी गोष्ट समोर आली की ज्या लोकांच्या ड्रिंकमध्ये अल्कोहल होतं त्यांनी शब्द स्पष्ट उच्चारले. विशेष म्हणजे वेगळ्या भाषेत बोलत असताना जराही अडखळले नाहीत. लोकांना त्यांची मातृभाषा वगळता इतर भाषेमध्ये बोलणं सर्वसामान्यपणे कठीण असतं. दारु प्यायल्यानं जरी एखाद्या भाषेचं अपुरं ज्ञान असलं तरी ती भाषा येत असल्याच्या अविर्भावात व्यक्ती नशेमुळे बोलते. मात्र दारुमुळे आरोग्यावर दुष्परिणामही होतात. स्मरणशक्ती आणि एकाग्रता यावर वाईट परिणाम होतो. लोक दारुच्या नशेत सहजपणे डच भाषेत बोलत होते. या लोकांना थोड्या प्रमाणात अल्कोहल देण्यात आलं होतं. लोकांना कमी प्रमाणात दारु प्यायला दिल्यानंतर असे निष्कर्ष समोर आले आहेत.