पूरग्रस्तांच्या नावाखाली घरात शिरुन चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले आहेत. आपल्याकडील धनधान्य, कपडे स्वयंसेवी संस्थांना देत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. मात्र, पूरग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली घरात शिरुन एका महिलेने घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा ६८ हजार ७४० रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे.

पुरदंर तालुक्यातील सिंगापूर गावामध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ज्ञानोबा सोनबा कोरडे (वय ५९, रा. सिंगापूर साई फार्म हाऊस, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ज्ञानोबा कोरडे यांचे बंडवस्ती येथे साई फार्म हाऊस आहे. दहीहंडी असल्याने टोमॅटो विकून आलेली १३ हजार ७४० रुपयांची रोकड त्यांनी कपाटात ठेवली होती. ते पत्नी, मुलगा शेतात कामाला गेले होते. घरात फक्त नातवंडे होती. दुसऱ्या दिवशी वाटाणा विक्रीतून आलेले २२ हजार रुपये ठेवण्यासाठी त्यांनी कपाट उघडले. तेव्हा आदल्या दिवशी ठेवलेले १३ हजार ७४० रुपये दिसले नाही. तसेच त्यांच्या पत्नीचे रंजना यांचे सोन्याचे गंठणही कपाटात दिसले नाही. त्यांनी नातवंडांकडे चौकशी केल्यावर खरा प्रकार समोर आला.

ते सर्व जण शेतात असताना एक महिला स्कुटीवरुन त्यांच्या घरी आली. पूरग्रस्तांसाठी तुमच्या आईची साडी घेऊन जायची आहे, असे म्हणून तिने कपाट उघडले अशी माहिती त्यांच्या नातीने दिली.
पूरग्रस्तांच्या नावाखाली या महिलेने घरात शिरुन सोन्याचे गंठण आणि रोकड लांबविली. सासवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like