कंगना Vs दिलजीत Twitter वॉर : पंजाबी सिंगरला बॉलिवूडचं समर्थन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं अलीकडेच शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. कंगना म्हणाली होती की, शेतकऱ्यांच्या नावाखाली प्रत्येकजण आपापली पोळी भाजून घेत आहे. याआधीही कंगनानं शेतकरी आंदोलनातील एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सहभागी होणाऱ्या 90 वर्षीय बिलकीस दादी सोबत केली होती. यानंतर ती ट्रोल झाली आणि तिनं ते ट्विट डिलीट केलं होतं. कंगनानं असा दावा केला होता की, हे 100 रुपयांसाठी प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असतात. यानंतर अनेक पंजाबी सेलेब्सनं तिच्यावर टीका केली. अ‍ॅक्टर आणि सिंगर दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) यानंही ट्विट करत कंगनावर निशाणा साधला होता. याला कंगनानंदेखील उत्तर दिलं होतं. कंगनानं दिलजीतला करण जोहरचा पाळीव म्हणून संबोधलं होतं. आता बॉलिवूड सेलेब्स मात्र दिलजीतला समर्थन देताना दिसत आहेत.

दिलजीतनं महिंदर कौर यांचा व्हिडिओ शेअर करत ट्विट केलं होतं. त्यानं लिहिलं होतं की, एखाद्यानं एवढंही आंधळं होऊ नये. काहीही बोलत फिरत असते.

यानंतर कंगनानं त्याला उत्तर दिलं होतं. कंगनानं हेच ट्विट रिट्विट करत लिहिलं की, ए करण जोहरच्या पाळीव, जी आजी शाहीन बागेत आपल्या नागरिकतेसाठी आंदोलन करत होती, तीच बिलकीस बानो आजी शेतकरी आंदोलनात एमएसपीसाठी आंदोलन करताना दिसली. महिंदर कौरजींना तर मी ओळखतही नाही. काय ड्रमा चालवलाय तुम्ही लोकांनी. हे सर्व आता बंद करा.

कंगना आणि दिलजीत यांच्या ट्विटर वॉरमध्ये सोशल मीडियावर अनेक लोक पंजाबी सिंगरला समर्थन देताना दिसत आहेत. अभिनेत्री स्वरा भास्करपासून तर अंगद बेदीपर्यंत अनेक सेलेब्सनं दिलजीतला खुलं समर्थन दिलं आहे. दिलजीत पंजाबची आन-बान-शान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.