जेव्हा ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर रिक्षा चालवते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे. उर्मिलाने मुंबईत जोरदार प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. यावेळी उर्मिलाने चक्क रिक्षा चालवत नागरिकांना मतदान करण्याची विनंती केली. उर्मिलाचे हे फोटो सध्या जबरदस्त व्हायरल होत आहेत.

रिक्षा चालक आपल्या मुंबईची जीवनवाहिनी
उर्मिला प्रचारासाठी गोरई परिसरात फिरत होती. तिनं रिक्षा चालकांची भेट घेतली आणि त्यांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं. इतकंच नव्हे तर तिनं चक्क रिक्षा चालवत आसपासच्या लोकांनाही मतदान करण्यास प्रवृत्त केलं. उर्मिलानं स्वत: हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘तुम्हाला रिक्षातून कुठं सोडायचंय का? रिक्षा चालक आपल्या मुंबईची जीवनवाहिनी आहे. त्यांना भेटून आनंद झाला’ असंही तिनं फोटोसोबत लिहिलंय.

https://www.instagram.com/p/Bvrh9y5p88y/?utm_source=ig_embed

दरम्यान काँग्रेस पक्षाला उर्मिला मातोंडकर यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. अखेर काँग्रेसने आपला उत्तर मुंबईचा उमेदवार जाहीर केला असून त्या नक्कीच विजयी होतील असा विश्वास काँग्रसने व्यक्त केल आहे. आतापर्यंत काँग्रेसमध्ये या जागेबाबत बराच संभ्रम होता. त्या जागेवरून कोणाला उमेदवारी दिली जाईल याबाबत बरेच तर्क-वितर्क लावण्यात आले होते. परंतु आता उर्मिला मातोंडकर अखेर या जागेमधून रिंगणात उतरल्या आहेत. या जागेमधून उर्मिला यांना उत्तर मुबंईचे भाजपाचे विद्यमान खासदार गोपाल शेट्टी यांचे आवाहन असणार आहे. त्यामुळे उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर विरूद्ध गोपाल शेट्टी अशी लढत रंगणार आहे.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने मोहिनी घालणाऱ्या उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. परंतु त्यांच्या अभिनयाची जादू जशी चित्रपटसृ्ष्टीत चालली तशीच निवडणुकीच्या मैदानात चालेल का हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे.