काँग्रेसने राजस्थानात गिरविला भाजपाचा ‘कित्ता’, संपूर्ण बसपा झाला काँग्रेसमध्ये ‘विलीन’

जयपुर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाने आपले सरकार मजबूत व्हावे, म्हणून गोवा व अन्य छोट्या राज्यात जी गोष्ट केली, त्याचा कित्ता काँग्रेसने राजस्थानात गिरवत मुख्यमंत्री अशोक गहलोत सरकार मजबूत केले आहे. विशेष म्हणजे भाजपाप्रमाणे काँग्रेसनेही या सर्व गोष्टी रात्री घडवून आणल्या आहेत.
राजस्थानमधील सर्वच्या सर्व ६ बसपा आमदारांनी आपला पक्ष काँग्रेस पक्षात विलीन केला आहे. सोमवारी रात्री बसपाच्या ६ आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांची भेट घेऊन आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करीत असल्याचे पत्र दिले.

राजेंद्र सिंह गुढा, जोगेंद्र सिंह अवाना, वाजिब अली, लखनसिंह मिना, संदीप यादव आणि दीपचंद  या आमदारांनी हे पत्र दिले असल्याचे अध्यक्ष जोशी यांनी सांगितले.

२०० सदस्य असलेल्या राजस्थान विधानसभेत २ जागा रिक्त असून त्यामुळे अशोक गेहलोत सरकार बहुमतात आले आहे. काँग्रेसचे १०० आमदार आहेत. त्यांचा सहयोगी पक्ष राष्ट्रीय लोकदल यांचा एक आमदार आहे. सत्तारुढ काँग्रेस पक्षाला १३ अपक्षांपैकी १२ अपक्षांनी पाठिंबा दिलेला आहे.

विशेष म्हणजे २००९ मध्ये अशोक गहलोत हे मुख्यमंत्री असताना काँग्रेसला बहुमतासाठी ५ जागा कमी पडत होत्या. त्यावेळी बसपाच्या सर्व ६ आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा देऊन सरकार स्थिर केले होते.