स्वाभिमानी शेतकरी संघटनेबद्दल राजू शेट्टींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सोलापूर : पोलिसनामा ऑनलाईन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोठी घोषणा केली आहे. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करून प्रदेश पातळीपासून गाव पातळीपर्यंत सर्व पदे बरखास्त केली आहेत. ही घोषणा राजू शेट्टींनी सोलापूर येथील सात रस्ता परिसरात असलेल्या मंगल कार्यालयात सुरु असलेल्या अधिवेशनात दिली. त्यांनी ही घोषणा केली तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्यासह राज्यातील इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

रविकांत तुपकर यासंदर्भात म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पक्षाची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रदेश पातळीपासून गाव पातळीपर्यंत सर्व पदे बरखास्त करण्यात आले आहेत. तसेच ते म्हणाले की पुढील काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला नवीन गती मिळण्यासाठी नव्याने कार्यकारिणी स्थापन करण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीतच मोठी राजकीय ताकद मिळण्यासाठी नव्या कार्यकारिणीत जास्त करून तरुणांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे असे तुपकर म्हणाले.

रविकांत तुपकर यांनी माहिती दिली की, ११ जानेवारी पर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार असून त्यानंतर ११ फेब्रुवारीपर्यंत प्रदेश कार्यकारणी गठित करण्यात येणार आहे. तसेच एका पदावर दोनच वर्ष पदाधिकारी म्हणून राहता येणार आहे असे देखील तुपकर म्हणाले. तसेच, नव्या पदाधिकारी निवडीसाठी एक आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात येणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज ला लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/