गोडाऊनच्या छतावरुन पडून उद्योजकाचा मृत्यू

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन

कंपनीच्या छतावर पत्रा दुरूस्तीसाठी गेले असता पत्रा फुटुन गोडाऊनच्या छतावरून खाली पडून उद्योजकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२१) सकाळी साडेआठच्या सुमारास खराबवाडी (ता.खेड) येथे घडली. ही घटना शेजारी असलेल्या कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पोपट महादेव सोमवंशी (वय ४५, रा.खराबवाडी, चाकण) असे मृत्यू झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. या घटनेची माहिती सदाशिव मल्लीकार्जुन आकुसकर ( वय ३०, धंदा ड्रायव्हर, रा. खराबवाडी, जंबुकर वस्ती, ता. खेड जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आज ( दि. २२ ) रोजी आकस्मिक मयत म्हणून नोंद केली आहे. गुरुवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने कंपनी बंद होती, त्यामुळे पत्रा दुरुस्तीचे काम करण्यासाठी ते गोडाऊनवर चढले होते. आज शुक्रवारी ( दि. २२ ) सकाळी ९ च्या सुमारास कामगारांनी कंपनीचे शटर खोलले असता घटना उघडकीस आली.

गुरुवारी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी सोमवंशी हे आपल्या ईर्टिगा गाडीतून आल्याचे व गोडाऊनवर चढण्यासाठी शेजारील दीक्षा कंपनीच्या समोरील शिडी गोडाऊनला लावल्याचे चित्रण दीक्षा कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवंशी यांचा इंडस्ट्रियल गोडाऊनचा व्यवसाय असून त्यांनी सोमवंशी इंडस्ट्रीज मधील एक गोडावून विनोद विजय सावळे (वय ३२, रा. नवमहाराष्ट्र विद्यालयासमोर, खराबवाडी, चाकण ) यांच्या काँक्रीटेक इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भाड्याने दिले आहे. सोमवंशी हे गुरुवारी ( दि. २१ ) रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास शेतात जातो असे घरामध्ये सांगून गेले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास ते आपल्या गोडावून कडे आपल्या ईर्टिगा गाडी( एम. एच. १४ ईयू ५७३४ ) मधून गोडाऊनकडे जाऊन गाडी पार्किंग करून मोबाईल रिंग वाजत असूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने व ते घरी न परतल्याने त्यांची पत्नी सुशीला यांनी चाकण पोलीस ठाण्यात आपले पती बेपत्ता असल्याची खबर दिली होती. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र मोरे हे पुढील तपास करीत आहे.

सोमवंशी ह्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, एक  मुलगा, भाऊ, भावजय, तीन बहिणी, पुतणे असा मोठा परिवार आहे. उद्योजक संभाजी सोमवंशी यांचे ते धाकटे बंधू, भाजपच्या जिल्हाध्यक्षा क्रांती सोमवंशी यांचे ते सासरे, भाजपचे संपर्क प्रमुख संदीप सोमवंशी यांचे ते चुलते, माजी सरपंच योजना सोमवंशी व माजी सदस्या साधना सोमवंशी यांचे ते दीर, तर राष्ट्रवादीचे खेड तालुका खजिनदार अरुण सोमवंशी यांचे ते बंधू होत.