एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने ‘या’ 2 मंत्र्यांपैकी एकाला द्यावा लागणार राजीनामा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेणाऱ्या एकनाथ खडसेंना (eknath khadse) राष्ट्रवादीत (NCP) सन्मानाचं स्थान दिलं जाणार आहे. गेल्या 40 वर्षापासून एकनाथ खडसे यांनी भाजपा (BJP) वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले. त्यामुळे खडसेंना राष्ट्रवादीत घेतल्यामुळे पक्षाला उत्तर महाराष्ट्रात मोठे बळ मिळणार आहे. मात्र, एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षातील घडामोडींना आता वेग आला आहे.

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एखाद्या विद्यमान मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. सध्यातरी राष्ट्रवादीत जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) आणि दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) या दोन मंत्र्यांची नाव चर्चेत आहे. एकनाथ खडसेंना कृषीमंत्री बनवण्यात येईल, पण त्यासाठी शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादीत खात्यांची अदलाबदल करावी लागेल. सध्या शिवसेनेचे दादा भुसे (dada bhuse) हे कृषीमंत्री आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंना हे पद देण्यासाठी त्याबदल्यात शिवसेनेला दुसरं खातं द्यावं लागणार आहे.

राजकीय चर्चेनुसार शिवसेना कृषी खात्याच्या बदल्यात राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खाते घेऊ शकते. त्यामुळे गृहनिर्माण खात्याचे विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. करमुसे प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप लागले आहेत. त्यामुळे ते वादात सापडले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरुन हटवून पक्षात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल, असं बोललं जात आहे. तर दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीच्या कारणामुळे फारसे सक्रीय नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड किंवा दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांपैकी एकाला राजीनामा द्यावा लागू शकतो.