कर्णबधीर आंदोलकांवर लाठीमार प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात विविध मागण्यांसाठी समाज कल्याण आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पुणे पोलिसांनी लाठीमार केला. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून लाठीमार करणाऱ्या पोलिसांची चौकशी सुरु झाली आहे. लाठीमार प्रकरणाचे पडसाद आज  राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये उमटले. लाठीमार करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी विरोधकांनी केली.

सोमवारी राज्यभरातील कर्णबधीर आपल्या विविध मागण्यांसह पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर जमले होते. ते एकमेकांशी सांकेतिक भाषेत संवाद साधत होते. मोठी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता होती आणि त्यामुळे पोलिसांनी पोलिसांनी सुरक्षेचा उपाययोजना म्हणून तो रस्ताही बंद केला होता. दरम्यान, त्याचवेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये विसंवाद निर्माण झाल्यामुळे लाठीमार केल्याची घटना घडली असावी. लाठीमार कऱणाऱ्या पोलिसांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली.

आंदोलक समाज कल्याण आयुक्तलयासमोर उभे होते. त्यावेळी त्यांनी मंत्रालयावर पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही आंदोलकांनी कठडे ढकलून दिल्याने ते पोलिसांच्या अंगावर पडले. त्यामुळे निर्माण झालेल्या तणाव आणि विसंवादातून लाठीमार झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी समन्वयाची भूमीका घेतली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आंदोलकांवर गुन्हे दाखल कऱण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी गुन्हे दाखल न करण्याचे आदेश दिले होते. तसेच पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.