‘बांगड्यांबद्दलची मानसिकता बदला’, आदित्य ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री फडणवीसांना सुनावलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जहरी शब्दांत टीका केली होती. ते म्हटले होते की छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर शिवसेना मूग गिळून बसली आहे. शिवसेनेने बांगड्या भरल्या आहेत का? या शब्दांत जहरी टीका त्यांनी केली होती. यावर पर्यावरणमंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून ते म्हणाले की, ‘मानसिकदृष्ट्या सर्वाधिक मजबूत असलेल्या महिला बांगड्या घालतात, हे लक्षात घ्या. त्याबाबतची तुमची मानसिकता बदला. राजकारण तर होतच राहील,’ अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना उत्तर दिले आहे.

काल मुंबईच्या आझाद मैदानावर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपने धरणे आंदोलन केलं. यावेळी फडणवीसांनी विविध विषयांना धरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली होती. ते म्हणाले होते की, महापुरुषांचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही. शिवसेनेनं बांगड्या भरल्या असतील, आम्ही नाही. अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून फडणवीसांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘राजकीय टीकेवर प्रतिक्रिया देण्याचं मी शक्यतो टाळत असतो. खरंतर फडणवीसांनी बांगड्या भरण्याचं जे काही वक्तव्य केलं आहे, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी. कारण, बांगड्या हे कमकुवतपणाचं लक्षण नसून सर्वाधिक मजबूत असणाऱ्या महिलांचा वर्ग देखील बांगड्या घालत असतो. राजकारण तर होतच राहील. पण आपल्या डोक्यातील काही संकल्पना आपण बदलायला हव्यात. माजी मुख्यमंत्र्यांना तर अशी भाषा अजिबात शोभत नाही.’

You might also like