EPFO नं 64 लाख खातेधारकांसाठी केली मोठी घोषणा ! आता घरबसल्या विना ‘टेन्शन’ जमा करू शकता ‘हे’ सर्टिफिकेट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह संस्था (ईपीएफओ) अंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे लोक आता कोणत्याही वेळी ऑनलाईन माध्यमातून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. ईपीएफओने याबाबत माहिती दिली आहे. देशभरातील सुमारे 64 लाख लोकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते.

ईपीएफओने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘निवृत्तीवेतनधारक आता त्यांच्या सुविधेनुसार वर्षाच्या कोणत्याही वेळी ऑनलाईनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. हे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध असेल.

यापूर्वी, दरवर्षी 1 नोव्हेंबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू होते. निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 30 दिवसांची संधी होती. नोव्हेंबर महिन्यात जर एखाद्याला जीवन प्रमाणपत्र सादर करता आले नाही तर त्याचे पेन्शन जानेवारी महिन्यापासून रोखले जात होते. परंतु आता ईपीएफओच्या या नव्या सुविधेनंतर वर्षाच्या कोणत्याही वेळी जीवन प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकते. एकदा प्रमाणपत्र सादर केल्यांनतर पुढील 12 महिन्यांसाठी ते वैध असेल. डिजिटल लाइफ सर्टिफिकेटला पहिल्यांदा 2015-16 मध्ये आणले गेले होते. ज्याच्या मदतीने पेन्शनधारकांना त्यांच्या आधार कार्ड नंबरच्या मदतीने बायोमेट्रिक पडताळणी करण्यात आली.

जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन मिळविण्यासाठी
आता बँक व्यवस्थापक किंवा कोणत्याही गैजेटेड अधिकाऱ्याच्या मदतीने जीवन प्रमाणपत्र तयार करावे लागणार नाही. आता ईपीएफओ कार्यालयात जाऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकते. जीवन प्रमाणपत्र पेंशन वितरण बँक, उमंग अॅप किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे देखील सादर केले जाऊ शकते. डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी करणे अनिवार्य आहे. यासाठी आपल्याकडे आधार कार्ड नंबर, पेन्शन पेमेंट ऑर्डर, बँक खात्याचा तपशील आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.