EPFO ने 31 डिसेंबरपर्यंत ट्रान्सफर केले 14,000 कोटी रुपये, जाणून घ्या कोणाच्या खात्यात आले पैसे !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणू दरम्यान कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 31 डिसेंबर 2020 पर्यंत कोविड – 19 संबंधित 56.79 लाख आगाऊ दावे निकाली काढले आहेत. या दाव्यांनुसार ईपीएफओने 14,310 कोटी रुपयांचे वितरण केले आहे. ईपीएफओच्या भागधारकांना ही आगाऊ रक्कम परत देण्याची गरज भासणार नाही. दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यावेळी, केंद्र सरकारने ईपीएफओच्या सहा कोटीहून अधिक भागधारकांना त्यांच्या खात्यातून तीन महिन्यांच्या मूलभूत वेतन आणि महागाई भत्तेची रक्कम काढण्यास परवानगी दिली होती.

31 डिसेंबरपर्यंत वितरण
माहितीनुसार, 31 डिसेंबर 2020 पर्यंत ईपीएफओने 56.79 लाख क्लीयरन्स क्लेमचे वाटप करत 14,310 कोटी रुपये वितरित केले. सूत्रांनी सांगितले की, ईपीएफओने 31 डिसेंबर 2020 पर्यंत अंतिम तोडगा, मृत्यू, विमा आणि अ‍ॅडव्हान्सचे 197.91 लाख दावे निकाली काढत 73,288 कोटी रुपये वितरित केले आहेत.

संघटित क्षेत्र बाधित
या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी सुमारे 20 टक्के रक्कम कोविड – 19 अ‍ॅडव्हान्सशी संबंधित आहे. माहितीनुसार, कोविड – 19 आगाऊ दाव्यांवरून असे दिसून येते की, देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांवर या साथीचा फार वाईट परिणाम झाला आहे. यावेळी, लोकांनी मोठ्या प्रमाणात रोजगार गमावले आहेत.

पगार कपात
मोठ्या संख्येने लोकांचे पगार कापले गेले आहेत आणि जबरदस्तीने स्थलांतरही झाले आहे. साथीच्या आजारामुळे आर्थिक दुर्बल घटकासाठी केंद्राने 26 मार्च रोजी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) सुरू केली. याशिवाय सरकारने ईपीएफ योजनेतून पैसे काढण्याची सुविधादेखील पुरविली होती. या काळात खासगी ईपीएफ ट्रस्टने 4.19 लाख कोविड – 19 अ‍ॅडव्हान्स क्लेमचे वाटप केले तर 3,983 कोटी रुपये वितरित केले.