EPFO कडून मोठा दिलासा, आता 65 लाख लोकांना थेट मिळणार लाभ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   वर्षातून एकदा निवृत्त वेतनधारकांना आपण हयात असल्याचा पुरावा बँकेकडे जमा करावा लागतो. यास हयातीचा दाखला, जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टीफिकेशन असे म्हटले जाते. जर हा दाखला देण्यास उशीर झाला तर पेन्शनधारकांची पेन्शन रखडते. वयोवृद्ध पेन्शनधारकांची यासाठी खुपच ओढाताण होते. मात्र, खुप उशीरा का होईना ईपीएफओने देशभरातील 65 लाख पेन्शन धारकांना दिलासा दिला आहे. आता निवृत्ती वेतनधारक त्यांच्या घराजवळील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये हयातीचा दाखला देऊ शकतात.

ईपीएफओच्या प्रादेशिक केंद्रावर जाऊन हयातीचा दाखला देता येईल. देशभरात 125 प्रादेशिक केंद्रे आहेत. 117 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय ईपीएफओ कार्यालय आहे. याशिवाय ज्या बँकेत पेन्शन मिळते, तेथेही हे काम करता येणार आहे.

देशभरात 3.65 लाख सामान्य सेवा केंद्रे असून ईपीएफओने त्यांच्याशी करार केला आहे. त्यांची कागदपत्रे कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली जातील. हे प्रमाणपत्र एका वर्षासाठी वैध असेल. पेन्शन धारक वर्षातून कोणत्याही महिन्यात हा दाखला सादर करू शकतात.

नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांनी आपल्या हयातीचा दाखला सादर करावा, असा या अगोदर नियम होता. नोव्हेंबरमध्ये दाखल जमा न केल्यास पुढील महिन्यात पेन्शन येत नव्हती. आता वर्षात कोणत्याही महिन्यात हे प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. मात्र ज्यांना जुने प्रमाणपत्र जमा करायचे आहे त्यांच्यासाठी शेवटची तारीख नोव्हेंबरपर्यंत असेल. ईपीएफओ कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचार्‍यांच्या सामाजिक सुरक्षेची काळजी घेणारी संस्था आहे.