‘एपिलेप्सी’चे जगभरात ६० दशलक्ष तर भारतात ५० लाख रूग्ण !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – एपिलेप्सी या मेंदूच्या विकाराचे जगभरात ६० दशलक्ष तर भारतात ५० लाख रूग्ण आहेत. एपिलेप्सी हा सर्वात जुन्या विकारांपैकी एक विकार आहे. या विकारास फेफरे येणे, फिट्स किंवा अटॅक्स म्हटले जाते. यामध्ये रूग्णाला होणारा त्रास हा प्रथमच पाहणाऱ्यांसाठी भीतीदायक असतो. या आजारात रुग्णाचे स्नायू ताठर होतात त्याची शुद्ध हरपते आणि तो जमिनीवर कोसळतो. शरीराला एका लयीत झटके (टॉनिक, क्लॉनिक, सीझर्स) बसतात. टॉनिक, क्लॉनिक, सीझर्स म्हणजे शरीर प्रथम ताठर (टॉनिक) होते, नंतर एका लयीत झटके (क्लॉनिक) देते. काही रुग्णांमध्ये अपस्मार काही न करता नाहीसा होऊ शकतो याला स्वाभाविक सूट (स्पॉण्टेनिअस रेमिशन) असे म्हणतात.

एपिलेप्सी आजाराबाबत माणसाला नेहमीच गुढ वाटत आले आहे. कारण या आजाराची अचानक नाट्यमय पद्धतीने लक्षणे दिसून येतात. त्याचा संबंध वय, वंश किंवा भौगोलिक प्रदेशाशी नसून त्याभोवती अनेक पूर्वग्रह, गैरसमजांचे जाळे विणले गेलेले आहे. एपिलेप्सीचे झटके अनेकदा अचानक येतात आणि काही काळ टिकून आपोआप थांबतात. तसेच फेफरे येण्याचे स्वरूप रुग्णागणिक वेगळे असते. काही वेळा एकाच रुग्णामध्ये वेगवेगळ्या प्रकारे फेफरे येऊ शकतात. अर्थात या फेफऱ्याचे स्वरूप प्रत्येक वेळी समान असते. प्रत्येक फेफरे आल्यानंतर आकडी (कन्व्हल्जन) येतेच असे नाही. या विकाराच्या काही रुग्णांना जागेपणी फेफरे येतात. यास जागृतावस्थेतील फेफरे (अवेक सीझर्स) म्हणतात. काही रूग्णांना झोपेत फेफरे येतात. यास निद्रावस्थेतील फेफरे (अस्लीप किंवा नॉक्टर्नल सीझर्स) असे म्हटले जाते.

अशाप्रकारे झटका आल्यास एखादवेळी दुखापतही होण्याची शक्यता असते. एपिलेप्सी विकार कोणत्याही वयात होत असला तरी त्याचे निदान साधारणपणे २० वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील लोकांमध्ये होते, असे तज्ज्ञ सांगतात. एपिलेप्सी हा अंगात येण्याचा प्रकार असल्याचा गैरसमज काही लोक करून घेतात. मात्र, हा मज्जासंस्थेशी संबंधित आजार आहे. एपिलेप्सी हा संसर्गजन्य नसल्याने एपिलेप्सीच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने एपिलेप्सी होत नाही. एपिलेप्सी हा जनुकीय विकार असल्याने तो कोणालाही कधीही होऊ शकतो. आनुवंशिकतेमुळे हा विकार होत असला तरी डोक्यावर झालेला आघात, ब्रेन ट्युमर किंवा पक्षाघात यामुळेही हा आजार होऊ शकतो.

एपिलेप्सीचे रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात. तसेच त्यांची क्षमता आणि बुद्धिमत्ता समान्य लोकांप्रमाणेच असतात. फेफरे आल्यावर एपिलेप्सीचा रुग्ण जीभ गिळू शकतो असा गैरसमज आहे. कारण मानवी जीभ कधीही गिळली जाऊ शकत नाही. झटका सुरू असताना जीभ दाताखाली येऊन चावली जाण्याची शक्यता असते. या रूग्णाला फेफरे आल्यास रुग्णाच्या तोंडात कोणतीही वस्तू घालू नये. रूग्णास कुशीवर झोपवावे. डोक्याला दुखापत होऊ नये म्हणून उशी द्यावी. एपिलेप्सीच्या रुग्णाला आलेले फेफरे थांबवण्याचे उपाय करू नये.