EPS पेन्शन 5 हजार होण्याची शक्यता !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईपीएस पेन्शन 5 हजार रुपयांची होण्याची( eps-employee-pension-scheme-5000) शक्यता असून यासंदर्भात स्थापन केलेल्या समितीची अतिशय महत्त्वाची बैठक बुधवारी (दि. 28) होणार आहे. त्यानंतर अहवाल हिवाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे.

ईपीएफएओच्या (EPFAO) अंतर्गत येणाऱ्या संघटित क्षेत्रातल्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना ईपीएफचा (EPF) लाभ उपलब्ध करून द्यायचा असतो. ईपीएफमध्ये कर्मचारी आणि कंपनीचं योगदान बेसिक पगार अधिक डीएच्या12-12 टक्के इतके असते. यापैकी कंपनीच्या 12 टक्के योगदानातील 8.33 टक्के रक्कम एम्प्लॉय पेन्शन स्कीममध्ये ( EPS) जाते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोव्हिडंड फंडावर जास्त व्याज देण्याची आणि एम्प्लॉई पेन्शन फंडच्या अंतर्गत दर महिना 5 हजारांची पेन्शन करण्याची तयारी सुरू झाली आहे. या दोन्ही विषयांवरील निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात उद्या बैठक होईल. यामध्ये ईपीएफओच्या अंतर्गत येणाऱ्या पैशांचे व्यवस्थापन आणि गुंतवणुकीवर चर्चा होईल. या समितीची स्थापना सहा महिन्यांपूर्वी झाली आहे. संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ अधिक फायदेशीर कसे करण्यात येईल, याचा विचार समितीकडून सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ईपीएफओचा फंड आणि त्याच्या गुंतवणुकीचे निर्णय व्यवस्थापक घेतात. कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनचा ईपीएफओवर पडणारा परिणाम याचा आढावा समितीकडून घेण्यात येणार आहे.

पीएफसाठी स्थापन केलेल्या समितीची बैठक उद्या होणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवण्याचा आणि खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मिळणारी रक्कम लवकर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. ईपीएस योजनेच्या अंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ करून ती दर महिन्याला 5 हजार रुपये करण्याचा विचार आहे. कामगारांच्या युनियन आणि संघटना गेल्या काही महिन्यांपासून याबद्दलची मागणी करत आहेत. ईपीएफबद्दलचे निर्णय घेण्यासाठी स्थापन केलेली समिती या सर्व मुद्द्यांवर उद्या होणाऱ्या बैठकीत चर्चा करेल. त्यानंतर समिती आपला अहवाल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर करेल. या समितीमधील सदस्यांनी इतर देशांमधील संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती कामगार मंत्रालयाला दिली आहे.