अवकाळीचा कांदा उत्पादकांना फटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे शहर, जिल्हा आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. याचा सर्वात जास्त फटका बळीराजाला बसतो आहे. एकीकडे कडक उन्हाळा आणि पाणी टंचाईचे सावट असताना आता आस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागतो आहे. उपलब्ध पाण्यावर पिकवलेला कांदा आता काढणीला आला आहे. पावसामुळे हा कांदा आता साठवणीसाठीचे मोठे आव्हान शेतकऱ्यापुढे आहे.

यंदाच्या वर्षी कांद्याचे पडलेले बाजारभाव यामुळे शेतकऱ्याचे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यानंतर आता अवकाळीच्या धसक्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाला आहे. हमखास पैसा मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याकडे पहिले जाते. कांदा काढणी, साठवणुकीचे काम एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरुवातीला चालू होते त्यावेळी कांदा साठवणुकीसाठी बराकी तयार करण्यात आलेल्या असतात मात्र बराकी अद्याप तयार झालेल्या नाहीत. अवकाळी पावसाला आताच सुरुवात झाल्यामुळे कांदा साठवणुकीचा प्रश्न तयार झाला आहे.

अवकाळी पावसाच्या धसक्याने शेतकऱ्यांची आहे ती पिके वाचविण्याची धावपळ पाहावयास मिळत असून शेतकरी मात्र सर्वच बाजुंनी संकटात सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कांद्याच्या किमती वाढणार ?
यंदा कांद्याचा म्हणावा तसा भाव शेतकऱ्याला मिळाला नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. असाच अवकाळी पाऊस सुरु राहिला तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला तर याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे. पण यामुळे कांद्याचं भाव मात्र वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या पोह्यातून कांदा गायब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. असे झाले तर मात्र कांद्याची साठवणूक केलेल्या व्यापाऱ्याची चांदी होईल.