CM ठाकरेंचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाला आदेश; म्हणाले – ‘गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा’

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या कडक निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला दिले. गेल्यावर्षी आपण कोरोनाला आटोक्यात आणण्यात ब-यापैकी यश मिळवले होते. पण आताची परिस्थिती कठीण अन् आव्हानात्मक आहे. नियमांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे ही बैठक झाली. त्यावेळी त्यांनी अधिका-यांनी कडक सूचना दिल्या. मुख्ममंत्री ठाकरे म्हणाले, जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र त्याठिकाणी नियम मोडले जात असल्यास किंवा गर्दी होत असल्यास त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात. विवाह समारंभ हे कोरोना संसर्ग फैलावण्यास मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. त्यादृष्टीने सर्व नियम व्यवस्थित पाळले जातात की नाही हे जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने पाहावे, असे ठाकरे यांनी सांगितले. गेल्या वर्षीपेक्षा कोरोना संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. तसेच ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर तसेच रेमडेसिविरसंदर्भात काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत. तसेच जम्बो कोविड सेंटर येणारा पावसाळा, वादळवारे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत की नाही हे तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट तातडीने करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा नको असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपण लागू केलेल्या कठोर निर्बंधाचा मुख्य उद्देश्य हा कोरोनाची संसर्ग साखळी तोडणे हा आहे. कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये, कोणतीही शंका असल्यास मंत्रालयाकडे तातडीने मार्गदर्शन मागावे, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले. दरम्यान राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 58, 952 रुग्ण आढळले आहेत. तर 278 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रथमच 6 लाखांपेक्षा अधिक झाली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्या काही कमी झाल्याचे दिसून आले आहे.