Pune : महानगरपालिकेकडून नदी संवर्धन योजनेसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना

पोलिसनामा ऑनलाईन – शहरातील नदी संवर्धन प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी स्तरावर स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून नदी संवर्धन प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे.

नदी सुधार योजनेअंतर्गत वाढीव दराने आलेल्या निविदा, महापालिकेच्या आवाक्याबाहेर गेलेला खर्च, राजकीय वाद आणि निविदा मान्य न केल्यास निधी परत जाण्याची भीती अशा कात्रीत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडकला आहे. चार टप्प्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. प्रकल्पाची कामे संथ गतीने सुरू असल्यामुळे वाढीव दराच्या निविदा आल्यामुळे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानेही महापालिकेला खडे बोल सुनावले होते. करारानुसार निविदा रद्द कराव्यात, असे जलशक्ती मंत्रालयाने आदेश दिल्यामुळे महापालिके पुढील अडचणीतही वाढ झाली आहे.

यापार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागातील अधिकार्‍यांचा या कक्षात समावेश करण्यात येणार आहे. राष्ट्रीय नदी सुधार योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सहा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची कामे करण्यासाठी महापालिकेने 450 कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. मत्स्यबीज केंद्र, हडपसर, मुंढवा, भैरोबा नाला, नायडू रुग्णालय आणि नरवीर तानाजी वाडी या ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जपान येथील जायका कंपनीकडून 980 कोटी रुपयांचे वित्तीय साहाय्य मंजूर झाले आहे. जायका कंपनीबरोबर करार करताना प्रकल्पाचा वाढीव खर्च महापालिकेला करावा लागणार आहे, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.