कात्रजमध्ये इस्टेट एजंटचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कात्रज येथील सच्चाई माता डोंगरावरील एका घरात इस्टेट एजंटचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. सच्चाई माता परिसरातील घरात त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तेव्हा त्याच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

अजय जयस्वाल (४२ रा. मुळ उत्तर प्रदेश, सध्या कोथरुड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकऱणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय जयस्वाला हा इस्टेट एजंट होता. तसेच तो सावकारीही करत होता. दरम्यान कालपासून त्याच्याकडे काम करणाऱ्या तरुणाचा फोन तो उचलत नव्हता. त्यामुळे त्याने जयस्वालचा शोध घेण्यास सुरुवात केली. जयस्वाल याचे सच्चाई माता डोंगर परिसरातही एक घर आहे. या घराचे बांधकाम सुरु आहे. तर कधी कधी पार्टी करण्यासाठी तो येथे येत होता. दरम्यान त्याच्याकडे काम करणाऱ्या तरुणाने या घरी येऊन पाहणी केल्यावर दाराला कुलुप होते. परंतु त्याने आत डोकावले तेव्हा जयस्वाल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांकडून खुन करणाऱ्याचा शोध सुरु आहे.

Loading...
You might also like