इम्रान खान यांना मोठा झटका, पाकिस्तानच्या विरूद्ध युरोपने उचलले ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पाकिस्तानच्या इम्रान सरकारचा डाव उलटला असल्याचे दिसत आहे. पाकिस्तान सरकारने कट्टरपंथी पार्टी तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) च्या समोर गुडघे टेकत संसदेत फ्रान्सच्या दूताच्या हकालपट्टीवर एक प्रस्ताव आणण्याची घोषणा केली. सोबतच युरोपीय देशांमध्ये ईंशनिंदा कायदा बनवण्याची वकीली केली होती, परंतु पंतप्रधान इम्रान खान यांचे हे पाऊल पाकिस्तानसाठी उलटे पडल्याचे दिसत आहे.

प्रत्यक्षात, युरोपीय संसदेने एक प्रस्ताव स्वीकारला आहे ज्यामध्ये पाकिस्तान सोबतच्या व्यापारी संबंधाचा आढावा घेणे आणि पाकिस्तानचा सामान्य प्राधान्य दर्जा (जीएसपी) संपुष्टात आणण्याची मागणी करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पीएम इम्रान खान यांनी मुस्लिम देशांना ईंशनिंदाच्या प्रकरणांना पश्चिमी देशांसमोर मांडण्याबाबत म्हटले होते. त्यांनी युरोपीय देशांमध्ये ईंशनिंदा कायदा बनवण्याची मागणी केली होती. परंतु आता युरोपीय संसदेतच ईंशनिंदा कायद्यावरून पाकिस्तानच्या विरूद्ध प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे.

युरोपीय संसदेचा हा प्रस्ताव पाकिस्तानच्या ईशनिंदा कायद्यांशी संबंधित आहे. प्रस्तावात शफकत इमेनुएल आणि शगुफ्ता कौसर यांच्या प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या या ख्रिश्चन दाम्पत्याला 2014 मध्ये पाकिस्तानच्या एका न्यायालयाने ईशनिंदाचे दोषी ठरवले होते आणि फाशीची शिक्षा सुनावली होती या दाम्पत्याला जुलै 2013 मध्ये अटक केली होती

युरोपीय संसदेने पाकिस्तान सरकारला ख्रिश्चन दाम्पत्य शगुफ्ता कौसर आणि त्यांचे पती शफकत इमेनुएल यांना मुक्त करण्याचे आवाहन केले आहे. युरोपीय संसदेने पाकिस्तानने देशाचा वादग्रस्त ईशनिंदा कायदा रद्द करणे, कौसर आणि इमेनुएल यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवणे आणि ताबडतोब आणि विनाअट त्यांची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्याची सुद्धा विनंती केली आहे.