अनेकांना त्रास झाल्यानंतरही मुंबईतील गॅस गळतीचे कोडे कायम ! दुर्गंधी, डोळे चुरचुरण्याच्या शेकडो तक्रारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई या विभागात शनिवारी रात्री लोकांनी गॅसची दुर्गंधी येत असल्याचे व डोळे चुरचुरत असल्याची माहिती दिली. एकाचवेळी शहराच्या अनेक ठिकाणाहून गॅस गळतीच्या तक्रारी असल्याने सर्व यंत्रणा कामाला लागल्या. सर्व संशयास्पद ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांनी जाऊन पाहणी केली. परंतु, कोणत्याही कंपनीतून गॅस गळती झाल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे लोकांना त्रास झाला. गॅसचा दुर्गंध लोकांना जाणवला, पण तो कोठून झाला हे कोडे कायम राहिले आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास गोवंडी, चेंबूर, काजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, अंधेरीपासून अगदी पवईपर्यंतच्या भागातून गॅस गळती झाल्याने दुगंध वास पसरला असून डोळे चुरचुरत असल्याच्या असंख्य तक्रारी येऊ लागल्या. ज्या ज्या भागातून या तक्रारी येऊ लागल्या. त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी १७ अग्निशामक दलाच्या गाड्या रवाना झाल्या.

महापालिकेनेही लोकांनी घाबरु जाऊ नये, तोंडाला, नाकाला ओला रुमाल लावावा, घरातच थांबावे, खिडक्या लावून घ्याव्यात, अशा सूचना केल्या. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मध्यरात्री ट्विट करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

अग्निशामक दलाच्या बरोबरच हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स आणि पोलिसांनी सर्व संभाव्य कंपन्यांमध्ये व जेथून तक्रारी येत होत्या. त्या भागात तपास केला. पण नेमकी कोठून गॅस गळती झाली व लोकांना त्रास झाला, याची माहिती मिळू शकली नाही. अमोनिया वायूमुळे हा त्रास झाल्याचे सांगितले जाते. मात्र, जर गॅस गळती झाली नाही तर लोकांना त्रास कशामुळे झाला, हे मात्र अजूनपर्यंत कोडे कायम आहे.