राज ठाकरेंकडे लगीनघाई सुरूच, मनसेकडून ५०० गरीबांच्या विवाहसोहळ्याचं आयोजन

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा पार पडला. अमित यांनी मिताली बोरूडे यांच्याशी लग्नगाठ बांधली. मिताली बोरूडे ही एक फॅशन डिझायनर आहे. अमितच्या लग्नानंतरही राज यांच्या घरी लगीनघाई असल्याचे दिसून येते. कारण आता 500 अदिवासी मुलामुलींच्या लग्नसोहळ्याचे आयोजन मनसेकडून करण्यात आले आहे. शिवाय या लग्नसोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.


मनसेकडून आता पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी भागातील 500 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. याबाबत मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे. विशष म्हणजे या विवाहसोहळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विशेष म्हणजे याबाबत माहिती देताना मनसेने शेतकऱ्यांची मनसे, कामगारांची मनसे असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सदर सामुदायिक विवाहसोहळा हा पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील खैरपाडा मैदानात आयोजित करण्यात आला आहे. हा सामुदायिक विवाह सोहळा शनिवार 9 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. मुख्य म्हणजे पालघर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान 27 जानेवारी रोजी राजपुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे विवाहबद्ध झाले. मोठ्या दिमाखात हा विवाहसोहळा पार पडला. ठाकरे कुटुंबीयांच्या या लग्नसोहळ्याला दिग्गज नेत्यांनी गर्दी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे, यांसह बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेतेही येथे हजर होते. राजपुत्राच्या या विवाहसोहळ्याची चर्चा राज्यभर रंगल्याचे दिसून आले.